मुंबई : एसटी कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपानंतर आता पुन्हा एकदा एसटी सेवा राज्यभर पूर्ण क्षमतेने सुरु होत आहे. आज (शुक्रवार, दि. 22) पासून जनसामान्यांचा आधार असलेली लालपरी पुन्हा एकदा सुसाट सुटली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या अल्टीमेटम नंतर कर्मचारी कामावर हजर झाले असून एसटी सेवा पूर्ववत सुरु होत आहे.
एसटी कर्मचा-यांच्या संपाचा तिढा तब्बल पाच महिने चालला. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी कर्मचा-यांनी संप पुकारला होता. त्यानंतर काही अन्य मागण्या देखील कर्मचा-यांनी केल्या. या मागण्यांवर विचार करताना राज्य शासनाने, एसटी महामंडळाने काही पावले मागे येऊन कर्मचा-यांच्या काही अटी मान्य केल्या.
राज्य शासन, एसटी महामंडळ काही पावले मागे येऊन काही मागण्या मान्य करत असताना देखील कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर हा वाद न्यायालयात गेला. एका समितीची स्थापना करण्यात आली. समितीला 12 आठवड्यात त्यांचा निर्णय देण्याची मुदत ठरली होती. 12 आठवड्यानंतर समितीने निर्णय दिला कि, एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे शक्य नाही.
हा निर्णय राज्य शासनाने स्वीकारला. त्यानंतर कामगारांना कामावर हजर होण्याची विनंती राज्य शासनाकडून करण्यात आली. कामगारांनी राज्य शासनाच्या आणि एसटी महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद न देता संप सुरूच ठेवला. त्यानतंर उच्च न्यायालयाने याप्रकरणी कर्मचा-यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याचा अल्टीमेटम दिला.
राज्याच्या दुर्गम भागात राहणारे नागरिक तसेच विद्यार्थ्यांना एसटी संपाचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली लालपरी बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. त्यात खाजगी वाहन चालकांनी ज्यादा पैसे आकारण्यास सुरुवात केली. पर्याय नसल्याने नागरिक खाजगी बसेस आणि अन्य वाहनांनी प्रवास करत होते.
गुरुवारी (दि. 21) 2 हजार 992 नवीन एसटी कर्मचारी कामावर दाखल झाले आहेत. आता हजेरीपटावरील 81 हजार 683 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 4 हजार 721 कर्मचारीच उरले असून लवकरच सेवेत दाखल होणार आहेत. कामावर हजर न झालेले कर्मचारी वैद्यकीय चाचणी करून सोमवारपर्यंत कामावर हजर होतील, अशी माहिती मिळत आहे.
सध्या दररोज सरासरी सात हजार बसेसच्या आधारे 25 हजार फेऱ्या चालवल्या जात असून त्यातून 17 लाख प्रवाशांची वाहतूक होत आहे. कोरोनापूर्व काळात एसटीमधून दररोज 65 लाख प्रवाशांची वाहतूक केली जात होती, तर दिवसाला 22 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला मिळत होते.