पुणे : एम.डी. या अंमली पदार्थासह एका नायजेरियन नागरिकाला पुणे गुन्हे शाखा एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई शुक्रवारी (दि.22) औंध येथे करण्यात आली. यावेळी पोलिसांनी 12 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
चुकवुमेका केनेडी अन्यकोरा (44, रा. खडकी रेल्वे स्टेशन जवळ, मुळ नायजेरीया) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना औंध येथील कचरा हस्तांतरण केंद्राजवळ नायजेरीयन व्यक्ती संशयीत रित्या उभी असल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी 12 लाख 38 हजार 100 रुपये किंमतीचे 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम वजनाचे एम.डी.हा अमली पदार्थ जप्त केला. यावेळी पोलिसांनी त्याच्याजवळील मोबाईल व रोख एक हजार रुपयेही जप्त केले. गुन्हे शाखा एकच्या पथकाने आरोपीला चतःश्रृंगी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
काही दिवसांपूर्वीच पुण्यात राजस्थान येथून अंमली पदार्थ आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी नायजेरीयन व्यक्तीवरील कारवाईनंतर पुण्यात अंमली पदार्थाचे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.