भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, भाऊ शंकर जगताप यांनी घेतला उमेदवारी अर्ज

राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी घेतला अर्ज

0

पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांताच दिली जाणार असल्याचे पक्षनेतृत्वाने स्पष्ट संकेत दिल्यानंतर जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप हे दोघे उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक आहेत. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांनी आज (गुरुवारी) भाजपसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. तर राष्ट्रवादीकडून नगरसेवक नाना काटे यांनी अर्ज घेतला आहे.

दोघांनी उमेदवारी अर्ज आणला आहे. त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. भाजपचा उमेदवार रविवार (दि.5) जाहीर होईल असे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

भाजप किंवा महाविकास आघाडीचे अद्यापही उमेदवार ठरले नाहीत. भाजपची उमेदवारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाताच दिली जाणार असल्याचे पक्षनेतृत्वाने स्पष्ट संकेत दिले आहेत. जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दोघांनीही उमेदवारी मागितली आहे.

त्यामुळे पक्ष नेतृत्वासमोर पेच निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 28 जानेवारी 2023 रोजी जगताप कुटूंबियांच्या घरी भेट देत बंद दाराआड चर्चा केली होती. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. दोघेही इच्छुक असल्याने पक्षाने कोणाच्याही नावाची शिफारस प्रदेश नेतृत्वाकडे केली नाही.

अशातच लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी आज एक पाऊल पुढे टाकले. थेरगावातील ग क्षेत्रीय कार्यालयातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून भाजपासाठीचा उमेदवारी अर्ज विकत घेतला. त्यामुळे अश्विनी जगताप यांची उमेदवारी निश्चित झाली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, शंकर जगताप यांनीही अर्ज घेतला आहे. अश्विनी जगताप या दोघांनी उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी सांगितली आहे. काही पदाधिकारी शंकर यांच्या तर काही पदाधिकारी अश्विनी जगताप यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते. भाजपचा उमेदवार रविवार (दि.5) जाहीर होईल असे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.