पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी JU ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक नागरिकांना घेता येतील. त्यासाठी इच्छूकांनी शुल्क भरुन चारचाकी वाहनांसाठी नंबर राखून ठेवावेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, “वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (नवीन इमारत, मोशी) येथे मोठ्या प्रमाणावर इच्छूकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. ब-याचवेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो.
नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणा-या चारचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी 21 सप्टेंबर रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करावा.
कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात अर्ज, डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. सदर डीडी DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD यांच्या नावे नॅशनलाईज / शेडयूल्ड बँकेचा पुणे येथील असावा.
अर्जदाराची ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची (उदा. आधारकार्ड, टेलिफोन बील इत्यादी) साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असल्याचे आदे यांनी म्हटले आहे.
चारचाकी वाहन क्रमांकाची यादी दिनांक 22 सप्टेंबर रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करायचा असेल तर त्यांनी दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असले त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही, तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल.
कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही. अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदे यांनी सांगितले.