पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये गाव देवी आणि गासावी वस्ती भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांवर बिबट्याने हल्ला केला आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.
संभाजी बबन आटोळे (45) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. संभाजी यांच्या गालाला आणि पायाला बिबट्याचे पंजे लागले आहेत. त्यांना ससून रुग्णालयात नागरिकांनी उपचारासाठी दाखल केले आहे. ते यात किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिरम कंपनीमागे गासावी वस्ती आणि गाव देवी परिसरात संभाजी व त्यांचे मित्र अमोल लोंढे हे मॉर्निंग वॉक करण्यास गेले होते. साडे पाच वाजण्याच्या सुमारास ते येथील रस्त्यावरून पायी चालत असताना गोसावी वस्तीत त्यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी अमोल लोंढे बाजूला सरकले. त्यावेळी बिबट्याने संभाजी यांच्या पायाला धरण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या पायाला बिबट्याचा पंजा लागला आहे. अचानक झालेल्या या घटनेने दोघेही घाबरले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे मॉर्निंग वॉक करण्यास आलेल्या नागरिकांनी येथे धाव घेतली. गोंधळ व आरडाओरडा झाल्याने बिबट्याला पळाला. लागलीच नागरिकांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान याची माहिती पोलीस व वन विभागाला देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याचा शोध घेतला जात आहे. परंतु त्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. तर यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे