पुणे : हडपसरमधील गोसावी वस्तीत मॉर्निंग वॉकला जाणार्या तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला करुन जखमी केले. पहाटे साडेपाच वाजता घडलेल्या या घटनेनंतर अग्निशमन दल, वन विभाग, पोलीस, महापालिका कर्मचारी, इंडियन हार्पेटलॉजिकल सोसायटी, मानव वन्यजीव सरंक्षक यांच्या प्रयत्नानंतर रात्री ११ वाजता बिबट्याला पकडण्यात यश आले. त्यानंतर त्याला बावधन येथील रेस्क्यु संस्थेत आणण्यात आले आहे. जवळपास १७ तास हा थरार रंगला होता.
संभाजी आटोळे व अमोल लोंढे हे पहाटे सिरम इन्स्टिट्युटमागील गोसावी वस्तीत असलेल्या गावदेवी मंदिर परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी गवतात लपवून बसलेल्या बिबट्याने अचानक संभाजी आटोळे यांच्यावर हल्ला केला. लोंढे यांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्याने बाजूच्या वस्तीत पलायन केले. बिबट्याच्या या हल्ल्यात आटोळे यांच्या छाती, कंबर, हात, पाय व मांडीवर बिबट्याने नखांनी ओरबडल्याने जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे जवान, वन विभागाचे कर्मचारी दिवसभर शोध घेत होते. मात्र, तो कोठेही आढळून आला नाही. तो गावदेवी मंदिराजवळील एका घराच्या शेजारी ठेवलेल्या पत्र्यामागे लपून बसला होता. रात्री नऊच्या दरम्यान कलावती नागरे (४५, रा. गोसावी वस्ती) या गावदेवी मंदिरात पूजा करीत असताना अचानक बिबट्याने डरकाळी फोडली. हे लक्षात आल्यावर वन विभागाच्या पथकाने तत्काळ वरिष्ठ अधिकारी आणि रेस्क्यु टीमशी संपर्क साधला. रेस्क्यु टीमने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याला डार्टच्या सहाय्याने भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला तपासणीसाठी बावधन येथील रेस्क्यु संस्थेत आणण्यात आले आहे.
मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला २४ तासात सुरक्षितरीत्या पकडण्यात आम्हाला यश आले आहे. यामध्ये पोलीस, महापालिका, रेस्क्यु संस्था, इंडियन हार्पेटलॉजिकल सोसायटी आणि मानद वन्य जीव रक्षकांची मदत मिळाली. एकत्रित प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी झाली, असे उपवनसरंक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.