महापालिका निवडणुकीत 80 हुन अधिक नगरसेवक निवडून आणू : गव्हाणे

0

पिपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने आपल्यावर विश्वास दाखवत शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या जबाबदारीला आपण नक्कीच न्याय देत राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देऊ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाने यांनी व्यक्त केला.

शनिवारी (दि.12) शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांसह राष्ट्रवादीचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित गव्हाणे बोलत होते. पुढे बोलताना गव्हाणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात शहराचा सर्वागिन विकास केला. गतवेळी झालेल्या निवडणुकीत आमच्या विरोधात अपप्रचार झाल्याने आम्हाला अपयश पहावे लागले. मात्र यावेळची परिस्थिती बदलली आहे. शहराचा विकास कोण करू शकतो याची खात्री शहरवासियांना झालेली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता येईल यात कोणतीही शंका नाही.

राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहराचा वेगवान विकास होत होता. त्या विकासाला भारतीय जनता पक्षाच्या पाच वर्षाच्या काळात खिळ बसली. शहर विकासाची संपूर्ण दिशाच भरकटली आहे. शहराचा विकास पुन्हा रुळावर आणणे आणि राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही गव्हाणे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आम्हाला 80 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास गव्हाणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शहराच्या विकासाची घडी पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी जनताच राष्ट्रवादीसोबत उभी रहिली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या सत्तेचा अनुभव जनतेने घेतलेला असल्याने भाजपाची महापालिकेतील सद्दी नक्कीच संपुष्टात येईल आ राष्ट्रवादीची बहुमताने पुन्हा महापालिकेवर सत्ता येईल, असेही गव्हाणे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.