चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप
दोन वर्ष पूर्ण होण्याच्या आता झाला न्यायनिवाडा
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने मानेवर वार करून पत्नीचा खून करणाऱ्याला पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश रूबी मालवणकर यांनी हा निकाल दिला. खून झाल्यापासून दोन वर्षांच्या आता या खटल्यात निकाल झाला आहे.
श्रीकांत कमाल चव्हाण (वय २७, रा. कर्नाटक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी संगीता यांचा खून केला होता. ही घटना ३१ मार्च २०१९ रोजी हडपसर परिसरात घडली होती. याबाबत संगीता यांची आई ताराबाई राठोड यांनी वानवडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
घटनेच्या पूर्वी पाच वर्षे श्रीकांत आणि संगीता याचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं आहेत. श्रीकांत याला त्याला दारूचे व्यसन होते. तो नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. श्रीकांत आणि इतर कुटुंबे राज्यात वेगवेगळ्या भागात जाऊन केबल टाकण्याचे काम करत असत. घटनेच्या वेळी ही कुटुंबे हडपसर भागात राहत होती. घटनेच्या दिवशी आजारी असल्याने श्रीकांत कामाला गेला नव्हता. श्रीकांत आणि संगीता यांच्यात घटनेच्या दिवशी दिवसभर भांडण सुरू होते. नियमित भांडणे होत असल्याने फिर्यादींनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास जोडप्याच्या दीड वर्षाच्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे फिर्यादी या श्रीकांत राहत असलेल्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी त्यांना श्रीकांत पळून जाताना तिला दिसला. तर मुलगी संगीता ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्यांच्या बाजूला कुऱ्हाड पडलेली फिर्यादींना दिसली. श्रीकांत याने कुऱ्हाडीने संगीता यांच्या मानेवर वार केले होते, असे फिर्यादीत नमूद आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे.
फिर्यादींची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा ठरला महत्त्वाचा :
या खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुनील हांडे यांनी पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादींची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. सहायक पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी गुन्ह्याचा तपास केला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक लोखंडे यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार ए. एस. गायकवाड आणि पवार यांनी मदत केली.