पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

दरीत दिले होते ढकलून

0

पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने वरंधा घाटातील दरीत ढकलून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी हा निकाल दिला.

विक्रम शंकर शेवते (४०, रा. मांजरी रस्ता, हडपसर) असे शिक्षा सुनावलेल्या पतीचे नाव आहे. त्याची पत्नी सुनीता यांचा खून झाला होता. याबाबत सुनीता यांच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना १३ जुलै २०१२ रोजी घडली होती. खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांनी १९ साक्षीदार तपासले. तत्कालीन पोलिस निरीक्षक अजित खडके यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी कॉन्स्टेबल पी. पी. पवार, ए. एस. गायकवाड यांनी मदत केली.

चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी सुनीता यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत असत. त्रास असह्य झाल्याने सुनीता यांच्या वडिलांनी एक लाख रुपये मुलीच्या सासरच्यांना दिले होते. त्यानंतरही पैशासाठी त्यांना त्रास देण्यात येत असत. मागणी पूर्ण करत नसल्याने विक्रम याने पत्नीला कारमधून फिरविण्याच्या बहाण्याने भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाट येथे नेले. तेथील कावळाकडा येथे पत्नीला दरीत ढकलून दिले होते.
वानवडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तिवाद करताना शेवते याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील ॲड. लीना पाठक यांनी केली.

त्यानुसार न्यायालयाने भादवी दंड संहिता कलम ३०२ (खून) नुसार जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंड आणि भादवी कलम ४९८ (अ) नुसार एक वर्षे साधा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.