रुग्णांची संख्या वाढल्यास गरजेनुसार लॉकडाऊन : मुख्यमंत्री

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला. पण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणखी वाढत राहिली तर जिथे गरजेचा वाटेल, त्या ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये जाऊन कोरोनाची लस घेतली. लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना महाराष्ट्रातील जनतेनेही कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे ज्यांना-ज्यांना कोरोनाची लस घेण्यासाठी पात्र ठरवले आहे, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी. लस नोंदणीसाठी मध्ये गोंधळ निर्माण झाला होता, पण आता अडचण दूर करण्यात आली आहे, लस सर्वांनी घ्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कदाचित काही ठिकाणी लॉकडाउन लागू करावा लागणार आहे. म्हणून माझी सर्व लोकांना विनंती आहे की, लसीकरण करून घ्या, अनावश्यक गर्दी करू नका, मास्क वापरा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करा, जर कुठे नियमांचे पालन केले जात नसेल, तर काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लावावा लागणार आहे, एक-दोन दिवसांमध्ये बैठक घेणार आहोत. त्यानंतर लॉकडाउनचा कडक निर्णय घ्यावा लागणार आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री अशा तीन जणांना लस देण्यात आलीे. याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविडशिल्ड लस घेतली आहे.

सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, १० पैकी ८ जिल्हे राज्यातील
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. विशेष म्हणजे देशातील १० जिल्ह्यांत सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस असून, त्यापैकी ८ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे आता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद या ८ जिल्ह्यांत देशातील सर्वांत जास्त अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.