पुणे : महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून अटक केलेल्या जुनैद याच्या संपर्कात असलेल्या एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. महाराष्ट्र एटीएसने काश्मीरमधून त्याला अटक केली आहे. तसेच तो लष्कर – ए – तोयबाचा दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र एटीएसने काही दिवसांपूर्वी जुनैदला पुण्यातून अटक केली होती. अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद जुनैद याला पुण्यातील दापोडी येथून अटक केली होती. दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर – ए – तोयबासाठी तो काम करत होता. त्याच प्रकरणात आता महाराष्ट्र एटीएसने काश्मीरमधून एका दहशतवाद्याला अटक केली आहे. या दहशतवाद्यांसोबत जुनैद सातत्याने संपर्कात होता.
जुनैदला 3 जूनपर्यंत कोठडी
जुनैद याला अटक करुन न्यायालयासमोर हजर केल्यानंतर 3 जूनपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली. महाराष्ट्र एटीएसने पुण्यातल्या दापोडीमध्ये कारवाई करत मोहम्मद जुनैद (28) याला अटक केली होती. त्याचा लष्कर – ए – तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या संघटनांशी थेट संबंध असल्याचं एटीएसच्या लक्षात आलं. याबाबतची माहिती दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला दिली होती आणि त्यानंतर जुनैद महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर आला होता. जुनैद हा 2 वर्षात सहा वेळा काश्मीरला जाऊन आलाय. तो फेसबुकद्वारे दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. तो फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर सिमकार्ड बदलून सतत सक्रिय होता.
मोहम्मद जुनैद याच्यावर नवीन लोकांची भरती करण्याची जबाबदारी होती. तो आणखी तीन जणांसोबत संपर्कात होता. तो शस्त्रास्त्र खरेदीसाठी फंडिंग गोळा करत होता. त्याने महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी रेकी केली. त्याच्या खात्यावर दोन वेळा पाच – पाच हजार रुपये दहशतवादी संघटनांकडून पाठवण्यात आले. ते विड्रॉ करुन त्याने वेगवेगळ्या कामासाठी वापरले.