पिंपरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने अर्थात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. हा केंद्रातील हुकुमशाही पद्धतीने काम करणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील उद्रेक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केली आहे.
लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता. त्याला पिंपरी-चिंचवडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापारी, कष्टकऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होण्यास पुढाकार घेतला. अत्यावश्यक सेवा वगळताअन्य व्यवहार सकाळच्या सत्रात बंद असलेले दिसले.
स्थानिक महाविकास आघाडीत एकोपा…
दरम्यान, महाराष्ट्र बंदच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीने पदाधिकारी एकवटलेले दिसले. पिंपरी कॅम्प आणि बाजारपेठ परिसरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम आणि शिवसेनेच शहरप्रमुख सचिन भोसले यांनी एकत्रित फेरी काढली. व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची एकवाक्यता दिसणार, असे संकेत मिळत आहेत.