13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर वन

0
मुंबई :  महाविकास आघाडी सरकार आणि खासकरुन शिवसेनेसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीय. प्रश्नम या संस्थेनं आपल्या त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात देशातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले आहे. द प्रिंटने त्याबाबत बातमी दिली आहे.
प्रश्नमकडून देशातील 13 राज्ये निवडण्यात आली होती. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या 13 राज्यांमध्ये देशातील एकूण लोकसंख्येच्या 67 टक्के लोक राहतात.
या सर्वेक्षणात नुकत्यात विधानसभा निवडणुका पार पडलेल्या तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसामचा समावेश नाही. तर आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पॅनेल नसल्यामुळे या राज्यांचाही सर्वेक्षणात समावेश करता आला नसल्याचं सांगितण्यात आलं आहे.
प्रश्नमने घेतलेल्या सर्वेक्षणात 13 राज्यात मिळून एकूण 17 हजार 500 जणांनी आपलं मत नोंदवलं. महत्वाची बाब म्हणजे हे सर्वेक्षण सर्वात मोठ्या सर्वेक्षणापैकी एक असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या सर्वेक्षणात 3 पर्याय देण्यात आले होते.
1. मुख्यमंत्र्यांची कामगिरी खराब असून ते पुन्हा मु्ख्यमंत्री म्हणून नको
2. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असली तरी पुन्हा त्यांना मत देणार नाही
3. मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली असून, पुन्हा हेच मुख्यमंत्री हवे
या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. त्यांना 40 टक्के मतं मिळाली आहेत.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबाबत मात्र नकारात्मक मतं मोठ्या प्रमाणात नोंदली गेली आहे. 60 टक्के मतदारांनी अमरिंदर सिंग यांची कामगिरी खराब असल्याचं म्हटलंय. तर केवळ 15 टक्के लोकांनीच त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलं आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांच्याबाबत सर्वाधिक नकारात्मक मतं नोंदवण्यात आली आहेत. त्यानंतर पंजाब आणि गुजरातचा समावेश लागतो.
Leave A Reply

Your email address will not be published.