महाराष्ट्र गारठला; उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे हंगामातील सर्वात कमी तापमान

0

पुणे : उत्तरेकडून आलेले थंड वारे आणि त्याचवेळी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांचा संगम झाल्याने एकाचवेळी उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तर, विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस असे चित्र राज्यात दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाबरोबरच थंडगार वारे यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे.

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर या परिसरात अवकाळी पावसाने झोडपले. संपूर्ण विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली.

उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान ६.१ अंश सेल्सिअस सोमवारी सकाळी नोंदविले गेले आहे. त्याचवेळी नाशिकमध्ये ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घसरण झाली आहे.

पुण्यातही रविवारी रात्रीपासून थंडीचा कडाका वाढल्याचे जाणवत होते. या हंगामात दुसर्‍यांदा जिल्ह्यातील किमान तापमान सिंगल डिजिट झाले आहे. पुण्यातील माळीण येथे सोमवारी सकाळी ८.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे शिवाजीनगर ११.६, मुंबई १५.२, रत्नागिरी १९.१, डहाणु १५.५, उस्मानाबाद १६.४, परभणी १६, अहमदनगर १२.४, जळगाव ९, कोल्हापूर १६.९, महाबळेश्वर १०.४, सांगली १५.९, सातारा १५, सोलापूर १६.७, अकोला १५.५, बुलठाणा १२.६, ब्रम्हपूरी १७.५, नागपूर १८.३, वाशिम १२, यवतमाळ १६, गोंदिया १६.८.

Leave A Reply

Your email address will not be published.