महाराष्ट्राचा कबड्डी संघ जाहीर; कर्णधार पूजा यादव, प्रशिक्षक शीतल मारणे

0

मुंबई : भारतीय कबड्डी महासंघ व हरियाणा राज्य कबड्डी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २६ मार्च या कालावधीत आनंद गड येथे ६९ व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मॅटवर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राने रविवारी आपला १२ सदस्यीय संघ जाहीर केला. मुंबई शहरच्या पूजा यादव हिच्या खांद्यावर महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे झालेल्या ६९ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून महाराष्ट्राचा हा संघ निवडण्यात आला आहे. निवडण्यात आलेल्या या संघात सर्वाधिक पुण्याच्या खेळाडूंचा समावेश असून त्यानंतर मुंबई शहराचा नंबर लागतो, अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी आज प्रसार माध्यमांशी बाेलताना दिली.

महाराष्ट्राच्या मुलींचा संघ प्रशिक्षिका शीतल मारणे-जाधव हिच्या मार्गदर्शनाखाली राज्य कबड्डी संघटनेच्या सभागृहात मॅटवर सराव करत आहे. युवा व अनुभवी खेळाडूंचा संघात भरणा असल्याने संघात चांगला ताळमेळ जळून आला आहे. स्पर्धेत आपला संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास प्रशिक्षिका मारणे यांनी व्यक्त केला. संघ २२ मार्च रोजी दुपारी १२० वाजता वांद्रे टर्मिनस येथून स्पर्धेकरता रवाना होईल.

महाराष्ट्राच्या महिला संघात युवा खेळाडू पूजा यादव (कर्णधार), सायली जाधव, अंकिता जगताप, पूजा शेलार, स्नेहल शिंदे, आम्रपाली गलांडे, सिद्धी चाळके, पूजा पाटील, हरजित कौर संधू, पौर्णिमा जेधे, प्रतिक्षा तांडेल आणि सायली केरीपाळे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर संघाच्या प्रशिक्षकपदी शीतल मारणे-जाधव यांच्या नियुक्ती करण्यात आली. तसेच संघ व्यवस्थापक म्हणून श्रद्धा गंभीर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.