पुणे : महाराष्ट्रातील तमाम कुस्तीशौकीन ज्या स्पर्धेची अतूरतेने वाट बघत होते त्या 65व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा शंखनाद होण्यासाठी आता अवघे काही तास उरलेत.
34 जिल्हे आणि 11 महानगरपालिका असे एकूण 45 संघ या प्रतिष्ठsच्या स्पर्धेचा आखाडा गाजविण्यासाठी कोथरूड (पुणे) येथील कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत डेरेदाखल झाले आहेत. 14 जानेवारीपर्यंत रंगणाऱया या स्पर्धेच्या द्वंद्वात राज्याच्या कानाकोपऱयातून आलेले रथी-महारथी पिळदार अन् दमदार मल्ल विजयासाठी जिवाचे रान करताना दिसतील.
महाराष्ट्र केसरीसाठीच्या प्रमुख लढतींसह गादी व माती या दोन्ही विभागांतील एकूण 18 वजनी गटांत 950 पैलवान आपली ताकद अजमावणार आहेत. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीच्या परिसरात लावलेले फलक, स्वागत कमानी यामुळे कोथरूडच्या परिसर कुस्तीमय झाला आहे. कुस्तीच्या या महासंग्रामाला मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून सुरुवात होणार असली तरी स्पर्धेचे मुख्य उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल योगेश्वर दत्त यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
पृथ्वीराज पाटील, बालारफीक शेख व हर्षवर्धन सदगीर हे माजी महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल यावेळीदेखील पुन्हा लंगोट लावून आखाडय़ात उतरणार आहेत. प्रकाश बनकर, किरण भगत हे माजी उपविजेते मानाची गदा जिंकण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठय़ा तयारीने आणि निर्धाराने या स्पर्धेत सर्वस्व पणाला लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुणे शहराचा हर्षद कोकाटे, पुणे जिह्याचा शिवराज राक्षे, सोलापूरचा सिपंदर शेख व कोल्हापूरचा माऊली जमदाडे यांच्यामध्येही कुठल्याही मल्लाला लोळविण्याची क्षमता आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा जिंकण्यासाठी मोठी चुरस बघायला मिळणार आहे. त्यामुळे कोण जिंकणार महाराष्ट्र केसरीची गदा, याचे उत्तर या घडीला तरी कोणीच देऊ शकणार नाही एवढे नक्की!