मुंबई : क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) चा प्रभावी आणि चांगला वापर होत असल्याने महाराष्ट्र राज्याला देशातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषित मिळाले आहे. नॅशनल रेकॉर्ड क्राइम ब्युरेच्या (एनसीआरबी) वतीने दिल्ली येथे ऑनलाईन सुरू असलेल्या ‘गुड प्रॅक्टीसेस इन सीसीटीएनएस’ परिषेदत हे पारितोषिक मिळाले आहे.
पोलिस तपासामध्ये गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आयसीजेएस आणि सीसीटीएनएस या सर्च प्रणालीची मदत होते. या प्रणालीमध्ये देशपातळीवरील गुन्हे आणि गुन्ह्यांची माहिती उपलब्ध होते. त्यानुसार गुन्हे प्रतिबंधक कारवाई करणे, पासपोर्ट चारित्र्य पडताळणी, वाहनांची पडताळणी करण्यासाठी या कार्य प्रणालीचा उपयोग होतो. देशात सर्वाधिक या कार्यप्रणालीचा वापर महाराष्ट्रात केला जात असल्याचे समोर आले आहे.
राज्यात ही कार्यप्रणाली राबविण्याचे काम राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केले जाते. सीसीटीएनएस या कार्यप्रणालीच्या मदतीने १५७३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. तर ७४३ चोरीच्या मालमत्तांचा शोध घेण्यात आला आहे. ६९३ हरवलेले व बेवारस मयतांचा शोध लावला आहे. सात हजार ८८३ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ५०७ आरोपींचे जामीन फेटाळण्यात आले आहेत. १३ हजार ७२१ व्यक्तींची पडताळणी करण्यात आली असून त्यापैकी चार हजार ६०१ व्यक्तींवर गुन्हे असल्याचे दिसून आले आहे. तसेच, एक लाख १७ हजार जणांची पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणी करण्यात आली आहे.