नवी दिल्ली : शिवसेनेतलं बंड, त्यानंतर राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरून घटनात्मक पेच निर्माण झाला असून, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज (10 जानेवारी) सुनावणी पडली आहे.
या सुनावणीत महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत काही महत्त्वाचा निर्णय लागणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, अवघ्या काही मिनिटातच ही सुनावणी आटोपली आहे. ज्यामध्ये कोर्टाने थेट 14 फेब्रुवारीला पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र सत्तासंघर्ष प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठामार्फत करावी की 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवायची याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही. कोर्टाने याबाबतची सुनावणी ही 14 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
शिवसेनेतल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, शिवसेना विधिमंडळ नेतेपदावरून एकनाथ शिंदेंना दूर करण्याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून दाखल करण्यात आलेली याचिका, राज्यपालांनी सरकार स्थापनेचं दिलेलं निमंत्रण या आणि इतर मुद्द्यांसंदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र, याबाबत अद्यापही कोणताच निकाल समोर आलेला नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही थेट व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी होणार आहे.
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एम.आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली आणि पी.एस. नरसिम्हा यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणी 1 नोव्हेंबर, 13 डिसेंबर अशा तारखांना झाली होती. 13 डिसेंबरनंतर नाताळच्या सुट्ट्या असल्याने सर्वोच्च न्यायायलायने थेट 10 जानेवारी ही सुनावणीची तारीख जाहीर केली होती. पण आज अवघ्या दोन मिनिटांच्या सुनावणीत कोर्टाने थेट पुढील महिन्यातील तारीख दिली आहे.