मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अॅड. राहुल नार्वेकर यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाल्याने आज होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचा फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्याचं चित्र दिसत आहे. अध्यक्षपदाची निवडणूक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागील काही दिवसांमधील निर्णय या साऱ्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि भाजपा असा संघर्ष सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन करणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल थेट प्रसारमाध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली.
विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना भुयार यांनी स्पष्ट शब्दांमध्ये भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळेस बोलताना कोश्यारी म्हणजे स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला मिळालेल सर्वात बोगस राज्यपाल असल्याचं म्हटलंय. “हे राज्यपाल फार विचित्र माणूस आहे. हे राज्यपाल कुठून आले, कसे आले, कोणी आणले त्यांचं त्यांनाच माहिती,” असा टोला भुयार यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला. पुढे त्यांनी, “जेवढे काही राज्यपाल महाराष्ट्राला स्वातंत्र्यापासून लाभले आहेत, त्यातला एक नंबरचा बोगस राज्यपाल म्हणजे हा राज्यपाल आहे. त्याच्यामुळे याच्यावर न बोलेलं बरं,” अशा शब्दांमध्ये कोश्यारींवर टीका केली.
“आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे मंत्रीमंडळाचा प्रस्ताव करुन पाठवला होता. मुळात मंत्रीमंडळाने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता देणे हे बंधनकारक असते असं असताना जवळपास अडीच वर्ष त्यांनी तो प्रस्ताव तसाच ठेवला व कोणताही निर्णय घेतला नाही. आता राज्यात नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यपालांचा हा निर्णय लोकशाहीला कितपत योग्य आहे याची चर्चा करायची गरज नाही. लोकांना हे सर्व ठाऊक आहे,” असे म्हणत शरद पवार यांनी राज्यपालांच्या एकंदरीत कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.