नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे देशाचे नवे लष्करप्रमुख असतील. पांडे सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत. लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे या महिना अखेरीस निवृत्त होत आहेत. लेफ्टनंट जनरल पांडे हे पहिले अभियंता असतील जे भारतीय लष्कराची कमान सांभाळतील.
लेफ्टनंट जनरल पांडे हे आधी इस्टन कमांडचे कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी अंदमान आणि निकोबारचे कमांडर-इन-चीफ पदही भूषविले आहे. लेफ्टनंट जनरल पांडे यांनी परम विशिष्ट सेवा पदक,अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक मिऴविल आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचा जन्म सीजी पांडे आणि प्रेमा यांच्या घरी झाला. त्यांची आई रेडियोचे उद्धोषक आणि होस्ट होत्या. त्यांचे कुटुंब नागपूरचे आहे. शालेय शिक्षणानंतर पांडे एनडीएमध्ये रूजू झाले. त्यानंतर इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि आधिकारी म्हणून कमिशन घेतले. 3 मे 1987 रोजी शासकीय दंत महाविद्यालयातील सुवर्णपदक विजेत्या अर्चना सालपेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.