‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात’ : चंद्रकांत पाटील

0

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो,’ असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”माझ्या वक्तव्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार चेष्टा केली जातेय. मात्र, सगळी चेष्टा त्यांच्या अंगलट येणार असून, मी जे म्हणत गेलो तेच होत गेले. जे जात्यात होते त्यांचे पीठ झाले आणि जे सुपात होते ते आता जात्यात जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो.”

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, ”राज्य सरकार उद्धव ठाकरे नव्हे, तर अजित पवारच चालवतात, ही वस्तुस्थिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परवा विधिमंडळात विनंती केली. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त त्यांच्याकडेच आहे. ते धाडसी आहेत, बाकीचे सगळे भेकड आहेत.”

दरम्यान, शिवसेना पदाधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाला सापडलेल्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ला दोन कोटी व 50 लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख असल्याबाबत विचारले असता, त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”ईडी ही स्वायत्त संस्था आहे. कोणाच्या घरी काय सापडले, त्यात काय आहे हे मला माहिती नाही. मात्र, खूप काहीतरी होणार आहे, असे दिसते.” असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.