महाविकास आघाडीचा वाईन विक्रीचा निर्णय योग्य होता : शरद पवार

0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत.

यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना मागील महाविकास आघाडी सरकारने घेतलेला वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तम होता, असे म्हटले आहे.

प्रत्येक फळांची संघटना आपण केली. मात्र, द्राक्ष संघाने जे काम केले ते देशात कोणत्याच संघाने काम केल्याचे पाहिले नाही. आपण दोन वर्षानंतर भेटतोय. या दरम्यान अनेक संकटे आली. यात द्राक्ष बागायतदारांना मोठी किंमत मोजावी लागली. गेली दोन वर्षे द्राक्ष निर्यातीला बंदी आली. अशात चीनने निर्यातीच्या नियमात अटी टाकल्या. त्यानंतर ज्या मर्यादा आल्या, त्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या उपस्थितीत द्राक्ष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

वाईन विक्रीचे धोरण मागील राज्य सरकारने आणले होते. हा उत्तम निर्णय होता. पण काही कारणास्तव तो अंमलात आला नाही. आजही देशातील ६० टक्के जनता शेती करते. जगाची आणि देशाची लोकसंख्या पाहता, शेतकऱ्यांचा आकडा दुर्लक्ष करुन चालणार नाही. लोकसंख्या वाढत असताना शेतीवर बोजा किती टाकायचा याचाही विचार केला पाहिजे, असे सांगत शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आम्हाला अस्वस्थ करतो. अर्थकारण जर व्यवस्थित राहिले नाही तर कर्जाच्या बोज्याखाली शेतकरी आत्महत्येचा पर्याय अवलंबतो. ही परिस्थिती येऊ नये याबाबतचा आपण एकत्रितपणे विचार करायला हवा, असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, देशातून ८ टक्के द्राक्षाची निर्यात होते, तर ९२ टक्के द्राक्षाची भारतीय बाजारपेठेत विक्री केली जाते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कशी मजबूत होईल, आर्थिक उलाढाल मोठी होईल याकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी आपण बोलणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.