पुणे ग्रामीणच्या कामशेत पोलीस ठाण्यात ACB ची मोठी कारवाई
पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले
कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल कदम व त्यांचे कर्मचारी महेश दौडकर यांच्यावर कारवाई झाली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांना अटक देखील झाली आहे. त्यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे. या गुन्ह्याचा तपासी अंमलदार यांचं कोर्टात म्हणणं देण्यासाठी त्यांनी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर हे अडीच लाख रुपये द्यायचे ठरले. पण कोर्टाने तक्रारदार यांना जामीन दिला नाही. त्यानंतर तक्रारदार हे सेशन कोर्टात जामिनासाठी गेले होते.
त्यावेळी कोर्टात से देण्यासाठी पुन्हा उर्वरित अडीच लाख रुपये मागितले होते. त्यावेळी तक्रारदार यांनी याबाबत पुणे ACB कडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज पथकाने सापळा कारवाई केली. त्यावेळी तडजोडीअंती 1 लाख रुपये घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.