पुणे: लष्कर भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात दिल्ली येथील मेजर दर्जाच्या पदाधीका-याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष एस.आर.नावंदर यांनी त्याला १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
वसंत विजय किलारी (४५, दिल्ली, मूळ. आंध्रप्रदेश) असे त्याचे नाव आहे. तामिळनाडू येथून अटक केलेला थिरू मगरून थंगवेल याने व्हॉटसअपवरून लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका लिक केली होती. थिरू याला वसंत यानेच ती प्रश्नपत्रिका पाठविली आहे. त्याने ती कुठून मिळविली, याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी केली.
या प्रकरणात यापूर्वी थिरू मुरुगन थंगवेलू (४७, रा. तमिळनाडू), किशोर महादेव गिरी (४० , रा. बारामती), माधव शेषराव गिते (३९, रा. सॅपिअर विहार कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (३९, रा. दिघी), उदय दत्तू औटी (२३, रा. खडकी), भारत लक्ष्मण अडकमोळ (३७, रा. पाचोरा) या सहा जणांना या प्रकरणात यापूर्वीच अटक केली आहे. त्यापैकी किशोर, माधव आणि उदय हे तिघे न्यायालयीन कोठडीत आहेत. उर्वरित तिघे पोलिस कोठडीत आहेत. तर अन्य दोघांवर गुन्हा दाखल आहे.
लष्कराच्या रिलेशन आर्मी अंतर्गत गेल्या आठवड्यात पुण्यासह देशात ४३ ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेत देशभरातील 40 हजार उमेदवार बसले होते. मात्र, या परिक्षेची प्रश्नपत्रिका पुण्यात फुटली असल्याची माहिती लष्करी गुप्तचर (एमआय) विभागाने पुणे पोलिसांना दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
मोबाईल पाण्यात पडून खराब झाला :
वसंत याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याने आणखी कोणाला प्रश्नपत्रिका पाठविली आहे. त्याच्यात आणि यापूर्वी अटक केलेल्या थिरू यांच्यात काय व्यवहार झाला आहे. तो मोबाईल पाण्यात पडून खराब झाल्याचे सांगत आहे. याबाबत तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली.