अँटो क्लस्टर कोविड हॉस्पिटल येथील व्यवस्थापन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिग्रहित

स्पर्श रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला आयुक्तांचा दणका

0

पिंपरी : ऑटो क्लस्टर रुग्णालयात रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याचे प्रकरण ताजे असतानाच याच ठिकाणी महापालिकेने मोफत उपलब्ध करून दिलेले रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल 40 हजार रुपयांना काळ्या बाजारात विकताना “ स्पर्श’च्या कर्मचाऱ्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे कोविड समर्पित रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयाला मेडिकल व पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याचा ठेका स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आला आहे. या हॉस्पीटलच्या दोन डॉक्टरांनी बेडसाठी पैसे घेतल्यामुळे त्यांना अटक झाली आहे. याच मुद्यावर सर्वसाधारण सभेतही मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी दहा दिवसांत “ स्पर्श’वर कारवाईचे आश्वासन दिले होते.

अँटो क्लस्टर कोविड हॉस्पिटल येथील व्यवस्थापन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिग्रहित केले आहे. मे.स्पर्श हॉस्पिटल अँटो क्लस्टर कोविड हॉस्पिटल चालवत असताना सदर व्यवस्थापनाबाबत मनपाकडे खुप तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याची दखल महानगरपालिकेने गांभीर्याने घेतलेली आहे. त्यामुळे मनपा आयुक्त श्री.राजेश पाटील यांनी सदरचे रुग्णालय मनपा अंतर्गत अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मे.स्पर्श हॉस्पिटल यांच्या गलथान कारभाराबाबत आपणास काळ्या यादीत टाकण्याबाबत कारणे दाखवा नोटीस व याबाबत आपणावरती फौजदारी गुन्हे का दाखल करण्यात येवू नये. याबाबत खुलासा चार दिवसात सादर करणेस सांगितलेला आहे.

तेथील रुग्णांच्या वैद्यकिय सेवेसाठी डॉ.अभयचंद्र दादेवार व त्यांचे सोबत पाच डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले असून सद्यस्थितीमध्ये असणारे सर्व रुग्णसेवक व तेथील संपूर्ण व्यवस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप , हे समन्वयक म्हणून कामकाज पाहणार आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.