मणिपूर : मणिपूरमधील हिंसाचारावर लगाम लागताना दिसत नाही. गुरुवारी रात्री संतप्त जमावाने केंद्रीय परराष्ट्र व शिक्षण राज्यमंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील कोन्ग्बा नन्देईबाम लेइकाई गावातील घरावर हल्ला केला. तथापि, पोलिस वेळेवर पोहोचल्याने अनर्थ टळला. रंजन सिंह हे घटनेच्या वेळी आपल्या घरीच असल्याचे समजते.
सूत्रांनुसार, हल्लेखोर जमाव मैतेई समुदायाचा आहे. रंजन सिंह हेदेखील मैतेई समुदायाचे आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून मणिपूरमध्ये दखल देण्याची मागणी केली होती. तथापि, मणिपूरमधील हिंसाचाराचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २९ मेपासून राज्याचा दौरा करणार आहेत.
भाजप आमदाराने दिला राजीनाम्याचा इशारा
इम्फाळ पूर्वच्या केइराओ या मतदारसंघाचे भाजप आमदार रामेश्वर यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. तथापि, मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा जिनेव्हातील संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगामध्ये निनादला आहे.