पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपला गळती लागली आहे. दरम्यान भाजपचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. ज्यांची निवडून येण्याची क्षमता म्हणजेच ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आहे, त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) पिंपरी चिंचवड येथे स्पष्ट सांगितले.
आकुर्डीतील एका खासगी कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, ”भाजपच्या कितीतरी नगरसेवकांना पाठीमागच्या काळात मी संधी दिली. माझ्या पक्षामार्फत त्यांना तिकीट दिले. अनेक वेगवेगळी पदे दिली. ते आमच्यातूनच घडले. पण, ठिक आहे. राजकारणात चढ-उतार येत असतो. पाठीमागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. भाजप सत्ताधारी पक्षात होता. त्यावेळेस काही लोकांना भाजपमध्ये जाऊन सत्ताधारी पार्टीत राहू, असे वाटत होते. आपल्या प्रभागातील कामे करता येतील, असे त्यांना वाटत होते.”
”शहरात चांगल्या प्रकारे काम करायचे असेल तर, महापालिका ताब्यात असल्यावर कामांबाबत समन्वय साधता येतो. मी विकासाचे ‘व्हिजन’ ठेऊन काम केले. आत्ताही आमच्या ताब्यात महापालिका नसली तरी, प्राधिकरणाचा काही भाग पिंपरी महापालिकेत ठाकला. हिंजवडीत महापालिकेच्या हद्दीत जागतिक दर्जाची “भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी” केली जाणार आहे. शहराचा आणखी विकास करण्यासाठी महापालिकेची सत्ता ताब्यात असावी, अशी माझी इच्छा आहे. जसे 288 मध्ये 145 आमदार गोळा करेल ते मुख्यमंत्री होतात आणि सरकार चालवितात. तशाच पद्धतीने महापालिकेत देखील असते.”
”माझ्या संपर्कात भाजपचे बरेचजण आहेत. परंतु, मी ज्यांना कोणाला यायचे आहे, त्यांनी आल्यानंतर नगरसेवकपद रद्द होता कामा नये, याची खबरदारी घेण्याचे मी त्यांना सांगतो. ते अपात्र झाले तर सहा वर्ष निवडणूक लढविता येत नाही. आत्ता आलेले अपक्ष आहेत. पत्नी नगरसेवक असेल तर पती आले आहेत. त्यांना पद रद्द होण्याचा त्रास होणार नाही. साधारण ज्यांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ आहे तिथे आमच्याकडे असणारे कार्यकर्ते आहेत. त्याच्यापेक्षा ताकदीचा उमेदवार मिळाला तर घेऊ. शेवटी मॅजिक फिगर महत्वाची असते”, असे पवार म्हणाले.