पुणे : वारजे परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केले. तसेच पीडित मुलीने विरोध केला असता तिच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यामुळेच हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पाच जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पीडित १४ वर्षीय मुलगी ही तिच्या मैत्रिणीसोबत वाढदिवसाच्या पार्टीसाठी वारजे परिसरात गेली होती. त्या ठिकाणी वाढदिवस साजरा झाल्यानंतर एका खोलीत नेऊन पीडित मुलीवर तिघांनी अत्याचार केले. या प्रकारानंतर घाबरलेली मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असता आरोपींनी तिला आणखी दोघे येणार आहेत. त्यामुळे घरी जाऊ नकोस, असे सांगत तिला अडवून ठेवले. तरीही पीडित मुलगी घरी जाण्यासाठी निघाली असता एका आरोपीने तिच्या दिशेने गोळी झाडली. पीडित मुलीने यावेळी छातीजवळ मोबाईल धरलेला असल्यामुळे ही बंदुकीची गोळी मोबाईलवर लागली. सुदैवाने यातून ती बचावली.
गुन्हे शाखेचे पथक पुणे शहर परिसरात गस्त घालत असताना त्यांना काही तरुणांजवळ पिस्तुल त्यांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पिस्तुलाबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यांची कसून चौकशी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेतला. त्यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.