पुणे : महिलेला जनावरांच्या गोठ्यात बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ही महिला गुरं बांधायला गोठ्यात गेली होती. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दोन जणांकडून आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. गेल्या काही महिन्यात पुणे परिसरात महिला अत्याचाराच्या अनेक घटना ऐकायला मिळत आहेत.
पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील भांबवडे गावात ही घटना घडल्याची माहिती आहे. 29 वर्षीय पीडित शेतकरी महिलेने राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी तिघा आरोपींच्या विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
शेतकरी महिला आपल्या गोठ्यात गुरे – ढोरे बांधत होती. त्यावेळी आरोपी अनिल आणि महेश तिथे अचानक गेले. त्या नंतर गोठ्याच्या दाराची कडी त्यांनी लावून घेतली. महिला एकटी असल्याची संधी साधत आरोपी अनिल आणि महेश यांनी पीडित शेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. 10 ऑक्टोबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2021 या काळात ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. राजगड पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे.