अमरावती : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटीची देशभर चर्चा आहे. देशातील दोन दिग्गज नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. भेटीमधील चर्चेबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडलेला आहे. राज्यपालांकडून या बारा आमदारांची नियुक्ती रखडली आहे. आम्ही अनेकदा विनंती करूनही उपयोग झालेला नाही त्यानंतर आम्ही पवार साहेबांना वरिष्ठ पातळीवर बोलायला सांगितलं होतं. त्यानुसार पवारांनी ही भेट घेतली असावी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांच्या आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर बोलताना, शरद पवार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची तक्रार करण्यासाठी गेलं असल्याचं म्हणाले होते. मात्र आता काही वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार असून ते याबाबत माहिती देणार आहेत.
दरम्यान, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची जेव्हा जेव्हा भेट होते त्यावेळी देशभर चर्चा होते. मात्र आता ज्या टायमिंगला भेट झाली आहे त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.