मुंबई : अंबानी यांच्या घरा शेजारील स्फोटक प्रकरणावरुन वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री उशीरापर्यंत मिटींग सुरु होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.
या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा झाली. मंगळवारी रात्री साधारण आठ वाजता ही बैठक सुरु झाली. मध्यरात्री 12 च्या सुमारास ही बैठक आटोपून मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरुन परतले. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
अंबानी स्फोटक प्रकरणात ‘एनआयए’कडून सुरु असणारा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या सगळ्या कटाची सूत्रे मुंबई पोलीस दलातील एका IPS अधिकाऱ्याने हलवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे आता ‘एनआयए’कडून या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी ‘एनआयए’ने गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.