पुणे : मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने आसाम येथील व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीकडून 20 लाख 52 हजार रुपये किमतीचे 171 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) जप्त करण्यात आले आहे. राहुल हितेश्वर नाथ (रा.शिवनेरीनगर गल्ली, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, शिवनेरीनगर गल्ली नं. 23 येथे आसाम राज्यातील एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कोंढवा परिसरातील शिवनेरीनगर येथील सार्वजनिक रोडवर सापळा रचला. त्यावेळी राहुल नाथ हा व्हेस्पा मोपेड वरुन संशयित रित्या जाताना आढळून आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 20 लाख 52 हजार रुपये किमतीचे 171 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडून 21 लाख 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार आझीम शेख यांनी फिर्याद दिली आहे.
ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे.