मंगळवारी रस्ता सुरक्षा अभियान 2021 निमित्त रस्ते अपघात प्रतिबंध व वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने जनजागृतीपर वाहतूक दिंडीचे आयोजन केले होते . यावेळी वाहतूक जनजागृती दिंडीची सुरुवात फुटवाले धर्मशाळा आळंदी येथून करण्यात आली.
महाविद्यालयीन विद्यार्थी , विद्यार्थिनी , प्राध्यापक एनएसएस व इतर सेवाभावी संस्था सहभागी झाल्या होत्या . दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात वाहतूक नियमांचे पोस्टर्स व बॅनर्स होते . तसेच जनजागृती रथ , पालखी , बैलगाडी , लेझीम पथक , भजनी मंडळ इत्यादी माध्यमातून वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात आली.
दिंडीचा शेवट फुटवाले धर्मशाळा सभागृह याठिकाणी झाला . तेथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या वाहतूक विषयक निबंध लेखन , चित्रकला , पोस्टर स्पर्धांमधील प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना कृष्ण प्रकाश , पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत संत साहित्यातील विविध उदाहरणे, दाखले देऊन जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक श्रीकांत डिसले यांनी केले. यावेळी वाहतूक शाखेकडून 32 वा रस्ता सुरक्षा अभियान 2021 दरम्यान राबविलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदे , पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर , पोलीस निरीक्षक साबळे , पोलीस उपनिरीक्षक रिकिबे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.