मुंबई : विनायक मेटे यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी राजेगाव येथे अंत्यसंस्कार झाले आहेत. असे असले तरी नेमका अपघात झाला कसा याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
यातच मेटेंचे कुटुंबीय आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होत आहे. त्याच अनुशंगाने आता रायगड पोलीसांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. घटनेनंतर प्रथम विनायक मेटे यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याची आरोग्य तपासणीही करण्यात आली होती.
घटनेचा तपास सुरु असतानाच विनायक मेटे यांच्या गाडीला धडक दिलेला आयशरही सीसीटीव्हीमध्ये समोर आला आहे. हा आयशर रसायनी पोलीस स्थानकात पोलीस घेऊन गेले आहेत. आता चौकशीचे पुढचे पाऊल म्हणून मेटेंचा ड्रायव्हर अन् आयशरच्या ड्रायव्हरची समोरासमोर बसून चौकशी होऊ शकते. या चौकशीतून काय समोर येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एका टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये विनायक मेटे यांच्या गाडीला ज्या आयशरने धडक दिली तो देखील समोर आला आहे. एवढेच नाही त्याचा चालक उमेश जाधव यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन आयशर रसायनी पोलीस स्थानकात लावण्यात आला आहे. यानंतर आता विनायक मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदम आणि आयशरचा ड्रायव्हर उमेश जाधव या दोघांची आता समोरासमोर चौकशी केली जाणार असल्याची शक्यता आहे. दोघांची चौकशी समोरासमोर झाली तर नेमके काय झाले होते हे समोर येणार आहे.
विनायक मेटे यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम हा रसायनी पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, रविवारीच त्याला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर चालकाने मद्यपान केले होते का, गाडी कशी धडकली, अपघात नेमका कशामुळे झाला, अशा विविध अंगांनी पोलीस तपास सुरु आहे. एकनाथ कदम यांच्यावरही कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या तीन वर्षापासून कदम हा मेटेंच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करीत आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातीलच असून अपघातानंतर त्यानेच ही घटना मेटेंच्या कुटुंबियांना सांगितली होती.