तमिळनाडू : तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टर मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी तसेच अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी होते. ते एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. या हेलिकॉप्टर मध्ये एकूण 14 जण होते पैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ANI च्या हवाल्याने वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा कोणाकडूनही देण्यात आलेला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये 14 लोक होते आणि त्यात एक वरिष्ठ अधिकारी सामील होता. अपघातानंतर तिघांना वाचवण्यात यश आले असून सध्या बचावकार्य सुरू आहे. सध्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे, मात्र आतापर्यंत कोणत्या लोकांना वाचवण्यात आले आहे, याची माहिती लष्कराकडून देण्यात आलेली नाही.
कुन्नूर नजीक भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधूलिका रावत, लष्करी अधिकारी हरजिंदर सिंग, गुरसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, साई तेजा, सतपाल व इतर हेलिकॉप्टर मध्ये होते.
भारतीय हवाई दलाने ट्विट करून बिपीन रावत Mi-17V5 मधून प्रवास करत असल्याची पुष्टी केली आहे. दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेशही हवाई दलाकडून देण्यात आले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्याचे काम सुरु झाले आहे.