मंत्री बच्चू कडू यांना सश्रम कारावासाची शिक्षा

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. 2017 साली भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार केली होती. यावरुन आज निकाल देण्यात आला आहे.

2014 साली विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं. यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. मुंबईत बच्चू कडू यांनी 42 लाख 46 हजाराचा फ्लॅट खरेदी केला होता, पण 2014 विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडूंवर होता. बच्चू कडू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते, कर्जाची परतफेड करता न आल्याने तो फ्लॅट विकल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला होता.

दरम्यान, याविरोधात अमरावती अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती. या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने आज निकाल दिला. बच्चू कडू यांना न्यायालयाकडून 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन महिने सक्षम कारावासाची शिक्षा दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.