पिंपरी : “मी कार्यक्रमाला चाललोय. सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. मी चळवळीतला माणूस आहे. कुणाला घाबरत नाही. पराचा कावळा करणं योग्य नाही. केलेल्या वक्तव्याचं 3 वेळा स्पष्टीकरण दिलं. दिलगिरी व्यक्त केली. अरे हिंमत असेल तर समोर या”, असं थेट आव्हानच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाई फेकणाऱ्यांना दिलं आहे. पाटील शाईफेकीनंतर माध्यमांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यातील वातावरण तापलं. विरोधकांनी ठिकठिकाणी पाटलांच्या वक्तव्याचा विरोध करत निदर्शन केली. यानंतर पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली तसेच माफी मागितली. त्यानंतर आता पाटलांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. ते पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरून निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन जणांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.