मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी काशिफ खानवर पॉर्न आणि ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचा आरोप केले आहेत. यावर काशिफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. तसंच माझा कोणत्याही पॉर्न किंवा ड्रग रॅकेटशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
काशिफ खान यांनी इंडिया टुडेशी बातचीत केली आहे. यावेळी काशिफ खान यांनी सांगितलं की, फॅशन टीव्ही इंडिया क्रूझवर आयोजित त्या कार्यक्रमात प्रायोजक म्हणून सहभागी झाला होता. आणि मी स्वतः तिकीट घेऊन तिथे गेलो होतो. तेथील जेवण आणि खोलीचे बिल त्यांनी क्रेडिट कार्डने भरले होते. ज्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.
फॅशन टीव्ही इंडियाचे एमडी काशिफ यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं की, मलिक यांचे आरोप ऐकून मला धक्का बसला आणि आश्चर्यही वाटलं. ते एक मंत्री आणि शक्तिशाली माणूस आहेत. मी त्यांचा खूप आदर करतो. ते असे काही आरोप करत आहेत. ज्यामुळे मी हैराण झालो आहे. काशिफ यांनी म्हटलं आहे की, मलिक यांनी आधी सर्व वस्तुस्थिती तपासावी. मग काहीतरी बोलावं. माझा कोणत्याही पॉर्न किंवा ड्रग रॅकेटशी काहीही संबंध नाही.
आर्यन खानच्या प्रश्नावर काशिफनं सांगितलं की, त्याने आर्यनला क्रूझवर पाहिले नाही. तसंच मी त्याला ओळखत नाही. ना मला ड्रग्जबद्दल माहिती आहे ना क्रूझवर कोणी काय घेतले आणि काय केले हे माहीत नाही. मी फक्त प्रायोजक म्हणून तिथे होतो.
समीर वानखेडेबाबत विचारलेल्या प्रश्नावर काशिफ खान यांनी म्हटलं की, मी एनसीबीच्या त्या अधिकाऱ्याला कधीही भेटलो नाही. त्यांच्याशी कधी बोललो नाही. तसंच मी कोणत्याही प्रकारच्या तपासाला आणि चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोणत्याही एजन्सीला सहकार्य करण्याची माझी पूर्ण तयारी आहे, असंही ते म्हणालेत.
या कार्यक्रमाबाबत काशिफ म्हणाले की, क्रूझ पार्टीचं आयोजक दिल्लीस्थित कंपनी आहे. ज्यांना त्यांच्या टीमचे लोक भेटले. ते लोक कोण आहेत हे मला माहीत नाही. कोणत्याही प्रकारची ड्रग्ज पार्टी किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीची माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. आपण एखाद्या कार्यक्रमाचे प्रायोजक असलो तर तिथे येणाऱ्या लोकांबद्दल, त्यांच्या वागणुकीबद्दल आपल्याला सर्व माहिती असणं हे गरजेचं नाही आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.