मंत्री उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

0

मुंबई : शिंदे – भाजप सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नाना चर्चांना उधाण आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पडद्यामागून हलचाली तर सुरू नाहीत ना, अशी चर्चा रंगताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांनी कालच शरद पवारांची सिल्व्हर ओक निवासस्थानी जात भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली, हे समोर आले नाही. मात्र, हिंडेनबर्ग अहवाल, राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधानांवर केलेले आरोप, अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी या विषयावर या भेटीत काथ्याकूट झालेला असू शकते, असा अंदाज अनेकांनी वर्तवला. त्यातच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय लवकरच देणार आहे. या पार्श्वभूमीवरही अदाणी पवारांकडे गेले असतील का, असा होराही अनेकांनी वर्तवला.

अदानी यांच्या भेटीनंतर आज उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. ते सिल्व्हर ओकवर पोहचले. विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये घाटकोपर येथे कार्यकर्ता शिबिर आहे. मात्र, या शिबिरासाठी अजित पवार यांना निमंत्रण नसल्याचे समजते. त्यांचे पत्रिकेवरही नाव नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक बोलावली आहे. या साऱ्या घडामोडी पाहता सामंत आणि पवार यांची भेटीची चर्चा आहे.

उदय सामंत यांनी नाट्य परिषदेच्या निवडणुकीबद्दल शरद पवारांची भेट घेतल्याचे सांगितले. ही निवडणूक वगळता कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री आणि अदाणी प्रकरणावर बदलेली राजकीय भूमिका पाहता, सामंत यांच्या दाव्यावर विश्वास ठेवणे अनेकांना अवघड जात आहे. जोपर्यंत राज्यातल्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार नाही, तोपर्यंत अशा गाठीभेटीकडे संशयाने पाहिले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.