पिंपरी-चिंचवड पोलीस भरतीसह वेगवेगळ्या २१ नोकर भरतीमध्ये गैरव्यवहार

तीन गुन्हे दाखल; ५१ जणांना अटक; ७३ जणांचा शोध सुरु

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस भरती गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी महाराष्ट्रातील २१ विविध नोकर भरतींमध्ये गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस भरती गैरव्यवहार प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्यावर आत्तापर्यंत ५१ जणांना अटक करण्यात आली असून, ७३ जणांचा शोध सध्या घेतला जात आहे. गैरव्यवहारातील आरोपींच्या पाच टोळ्या निष्पन्न झाल्या असून, अजून टोळ्या रडावर आहेत.

अटक आरोपींमधील पाच मास्टरमांईडपैकी एक असलेल्या अंकूश काळे याने पिंपरी-चिंचवड भरतीसह महाराष्ट्रात गेल्या आठ-दहा वर्षात झालेल्या मुंबई शहर पोलीस भरती, मुंबई पोलीस चालक भरती, पालघर पोलीस भरती, मुंबई लोहमार्ग पोलीस भरती, पुणे लोहमार्ग पोलीस भरती, कुसडगाव एसआरपीएफ भरती, नागपुर कारागृह पोलीस भरती गैरव्यवहार केल्याचा लेखी खुलासा पोलिसांकडे केला असून, याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने ३ हजार पानांचे आरोपपत्र कोर्टात सादर केले आहे.

शासनाच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या पाच टोळ्यांपैकी बीडचा अंकुश काळे व्यतिरिक्त औरंगाबादमधील वैजापूर, थेऊर, दौलताबाद तर जालना येथे टोळी मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पुण्यात मागील आठवड्यात अशाच प्रकारे एका आरोपीला अटक झाली असून, त्याने टेक्नॉलजीचा वापर करीत परिक्षेत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

गेल्या आठ महिन्यांमध्ये झालेला पोलिसांचा तपास तत्कालीन सरकारने उघड होऊ दिला नसल्याचेही समजते.
स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यावर भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकाच वेळेस विविध जिल्ह्यांमध्ये भरती राबविली गेली होती. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी भरती प्रक्रिया आणि नंतर गैरव्यवहाराचा तपास अशी दुहेरी धुरा सांभाळून गुन्ह्याला वाचा फोडली. हिंजवडीत एका उमेदवाराच्या मास्क मध्ये मोबाईल डिव्हाइस लावल्याचे उघड झाले. त्यानंतर संपूर्ण परिक्षा प्रक्रियेवर वेगळ्या पद्धतीने लक्ष केंद्रीत करण्यात आले.

भरती प्रक्रियेत किमान ८५ उमेदवार हे सामुहिक कॉपी व्दारे सहभागी होणार असल्याचे एक पत्र आयुक्तालयाला अज्ञाताकडून पाठविण्यात आले होते. मात्र, त्याची वेळीच गांभीर्याने दखल घेतली नसल्याचेही आता समोर येत आहे. हिंजवडी, चिंचवड आणि निगडी पोलिस ठाण्यात भरती घोटळ्यासंदर्भात गुन्हे दाखल करून तपास करताना पोलिसांनी त्या पत्राची पुन्हा पडताळणी केली असून, हे रॅकेट राज्यभर पसरल्याचे उघड झाले आहे.

डमी उमेदवाराऐवजी स्वत: परिक्षा केंद्रात उपस्थित राहून पेपर सोडविण्याच्या रॅकेटचा एक भाग होण्यासाठी किमान सात लाख ते कमाल १८ लाख रुपये उमेदवारांकडून देण्यात आले आहे.

पंधरा मिनिटात केंद्राबाहेर सोडविले पेपर
छुप्या ऑटोमॅटीक कॅमेऱ्यातून पेपर केंद्राबाहेर पाठविले जात होते. त्यानंतर एमपीएससी उतीर्ण झालेल्या अन्य उमेदवारांकडून हे पेपर सोडवून मोबाईल फोन व्दारे उत्तर आत सांगितली जात होती. बहुपर्यायी उत्तर पत्रिका असताना देखील सामुहिक कॉपी करून उमेदवारांनी परिक्षा दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

भरतीत टॉपरही सामुहिक कॉपीत सहभागी
भरती पक्रियेत टॉपर आलेल्या अनेक उमेदवारांनी सामुहिक कॉपीत सहभागी असल्याचे तपासात उघड झाले आहे. संशय वाटल्याने अनेक उमेदवारांना पुन्हा परिक्षा घेण्याासठी बालोवून घेतल्यावर सामुहिक कॉपीचा प्रकार उघड होत गेला.

सामुहिक कॉपीसाठी टेक्नॉलजिचा वापर
मास्क मध्ये मोबाइलचे काही पार्ट बसवून कॉपी करण्याच्या प्रयत्नाचा उलगडा परिक्षेच्या दिवशी झाला होता. मात्र, त्यानंतर तपासाला गती मिळत नव्हती. दरम्यान, संशयावरून काही उमेदवारांना बोलावून घेतल्यावर सामुहिक कॉपीची पध्दत आणि त्यासाठी झालेला टेक्नॉलजिचा वापर स्पष्ट होत गेला.

एमपीएससी करणाऱ्यांनी सोडविले पेपर
सामुहिक कॉपी करणाऱ्या बहुतांश उमेदवारांनी व्हिआयपी-प्रो हा एटीएम कार्डच्या आकाराचा मोबाईल अंतरवस्त्रात लपवून परिक्षा केंद्रात नेला होता. कानातील इअर-बड ब्लुटूथव्दारे या मोबाईलला कनेक्ट करण्यात आले होते. चार-चार जणांचा गट करून पेपर सोडविण्यात आले. एमपीएससीची तयारी करणाऱ्या किंबहुना काही परिक्षांमध्ये पास झालेल्यांचा यात वापर करण्यात आला असून, आता हे सर्वजण आरोपीचा पिंजऱ्यात उभे ठाकले आहेत. पेपर सोडविण्यात आल्यावर मोबाईलवरून व्हीआयपी-प्रो कंपनीच्या वेगळ्या प्रकारच्या मोबाईलवर केंद्राबाहेरून संपर्क साधला जात होता. त्यानंतर उमेदवाराला त्याला मिळालेली उत्तर पत्रिका बहुपर्यायी पैकी कोणत्या पर्यायातील आहे याची विचारणा करून उत्तर सांगितली जात होती.

पोलिसांना ज्या उमेदवारांबाबत संशय होता त्यांना गुन्हेशाखेच्या कार्यालयात अथवा आयुक्तालयात पाचारण करून काही प्रश्नांची उत्तर पुन्हा विचारण्यात आली. यामध्ये टॉपर आलेल्या उमेदवारांना सामान्य ज्ञात जसे की राज्याचे प्रमुख पद आणि त्यावर सध्या विराजमान असलेली व्यक्ती कोण अशा स्वरूपाची विचारणा केल्यावर या उमेदवारांचा उडालेला गोंधळ आणि त्यांनी कॉपी केल्याची दिलेली कबुली यातून या प्रकरणाची खोली उघड होत गेली आहे.

व्हॉट्स ॲपचा एक ग्रुप करून परिक्षा आणि एकूणच पेपर फुटी प्रकरणाची चर्चा त्या ग्रुपवर होत होती. सुरुवातीला एक आरोपी अटक झाल्यावर तो ग्रुप डिलीट करण्यात आला. परंतु, सायबर पोलिसांनी त्या ग्रुपवर झालेले सगळे चॅटिंग रिकव्हर केले आहे.

शेती विकून दिले होते एजंटला पैसे उमेदवारांपैकी काहीजणांनी घर-शेती विकून आलेले पैसे कॉपीचे रॅकेट चालविणाऱ्या एजंटला दिले होते. तर पेपर सोडविण्यासाठी ज्यांची मदत घेण्यात आली त्यांना किरकोळ पैशांवर बोळवण केल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर, पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित, सहाय्यक निरीक्षक सिद्धनाथ बाबर आणि त्यांच्या पथकाने केली आहे. तपास सहायक निरीक्षक बाबर करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.