पुणे : मांजर समजून मालकाने रोज दूध-ब्रेड, पोळी खायला दिल्याने ‘चुटकी’चे पोट बिघडले, त्वचेचा संसर्ग होऊन केसही गळायला लागले. काही दिवसांतच संबंधित व्यक्तीला आपण मांजर नव्हे, तर बिबट्याचे पिल्लू पाळल्याचे लक्षात आले. अशा मरणासन्न अवस्थेत दवाखान्यात दाखल झालेल्या ‘चुटकी’ला वाचविण्यासाठी डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि योग्य वेळेत ‘बुटकी’ने केलेल्या रक्तदानाचा उपयोग झाला. या घटनेला आता पाच महिने झाले असून, ‘चुटकी’ आता टुणटुणीत झाली आहे. दिवसभर पिंजऱ्यात तिची भटकंती सुरू असते.
पुण्यातील वन विभागाचे ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ असलेल्या ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’मधील ही घटना. जूनच्या पहिल्या आठवड्यात नाशिक वन विभाग आणि इको एको संस्थेने ताब्यात घेतलेले तीन महिन्यांचे बिबट्याचे पिल्लू रेस्क्यू संस्थेकडे दाखल झाले होते. पिल्लाची तब्येत नाजूक होती. दोन दिवस त्याच्यावर उपचार केले; पण एका रात्री त्याची तब्येत अचानक खालावली. हिमोग्लोबिन घटल्याने त्याला वाचविण्यासाठी रक्ताची गरज होती. या दरम्यान बिबट आईपासून विलग झालेले त्याच वयाचे एक सुदृढ पिल्लू केंद्रात दाखल झाले होते. संस्थेतील पशुवैद्यकीयतज्ज्ञ डॉ. निकिता मेहता आणि डॉ. कल्याणी ठाकूर यांनी त्याचा रक्तगट तपासला. योगायोगाने दोन्ही रक्तगट समान होते. वन विभागाने परवानगी दिल्याने सुदृढ पिल्लाचे रक्त आजारी पिल्लाला देण्यात आले.
‘यापूर्वी देशात काही तज्ज्ञांनी वाघाच्या बाबतीत हा प्रयोग केला होता. मात्र, त्यात आजारी वाघाचा काही तासांतच मृत्यू झाला. आमच्याकडील पिल्लाची तब्येत खूपच नाजूक असल्याने जगण्याची शाश्वती नव्हती; पण आम्ही प्रयत्न करायचे ठरवले. रक्तदान केल्यानंतर आम्ही दोन्ही पिल्लांच्या हालचालींवर रात्रभर लक्ष ठेवून होतो. विशेष म्हणजे, दोन दिवसांत आजारी पिल्लाच्या हालचालीत आम्हाला सकारात्मक बदल दिसले. यानंतर आम्ही टप्प्याटप्प्याने त्याला प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे सुरू केली, आहारात बदल केले,’ अशी माहिती ‘रेस्क्यू वन्यजीव उपचार केंद्रा’च्या प्रमुख नेहा पंचमिया यांनी दिली.
बिबट्याची दोन्ही पिल्ले मादी असून, त्या समान वयाच्या असल्याने आम्ही त्यांचे नाव ‘चुटकी’ आणि ‘बुटकी’ ठेवले आहे. या प्रयोगाला चार महिने झाले असून, दोन्ही पिल्ले एकदम चुणचुणीत आहेत. सध्या पिल्लांना निसर्गात सोडणे शक्य नाही, त्यामुळे आम्ही त्यांची काळजी घेत आहोत. दोघींचा पिंजरा समोरासमोर असल्याने त्या एकमेकींशी खेळण्याचाही प्रयत्न करीत आहेत,’ असे पंचमिया यांनी सांगितले.