पिंपरी, दि. २० – पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगताप आणि आमदार उमा खापरे यांनी सोमवारी (दि. २०) सकाळी मुंबईला अधिवेशनासाठी जाताना पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि माजी नगरसेविकांसोबत एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केला. शिंदे-फडणवीस सरकारने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना ५० टक्के सवलत सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जगताप व खापरे यांनी एसटीने वल्लभनगर आगारापासून ते लोणावळापर्यंत एसटी बसने प्रवास करून महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या दोन महिला आमदार आहेत. अश्विनी जगताप या चिंचवड विधानसभेच्या, तर उमा खापरे या विधान परिषदेच्या आमदार आहेत. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील या दोन्ही महिला आमदारांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या लालपरीला अर्थात एसटीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या दोन्ही महिला आमदारांनी सोमवारी सकाळी वल्लभनगर आगारातून लालपरीने प्रवास केला.
भाजपच्या दोन्ही महिला आमदारांनी वल्लभनगर आगार ते लोणावळापर्यंत एसटीने प्रवास करून महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. पिंपरी-चिंचवड भाजपमधील महिला पदाधिकारी व माजी नगरसेविकांनीही सहप्रवासी म्हणून दोन्ही महिला आमदारांसोबत लोणावळापर्यंत प्रवास केला. त्यामध्ये माजी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, निर्मला कुटे, सविता खुळे, वैशाली जवळकर, माधवी राजापुरे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा उज्ज्वला गावडे, माजी शहराध्यक्षा शैला मोळक, दिपाली धानोरकर, सुप्रिया चांदगुडे आदींचा समावेश होता.
एसटी प्रवास केल्याबाबत बोलताना आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, “सध्याचे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार महिलांना न्याय देणारे सरकार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात या सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यातून राज्यातील माझ्या महिला भगिनींना प्रवास करण्यासाठी मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एसटीने प्रवास करून महिलांना दिलेल्या सवलतीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे महिला प्रवाशांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.”
आमदार उमा खापरे म्हणाल्या, “भाजप-शिवसेना युती सरकारने नेहमीच सामान्यांचे जगणे सुसह्य करणारे निर्णय घेतले आहेत. महिलांना एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. आज आम्ही अधिवेशनाला जाताना पिंपरी ते लोणावळा असा महिला पदाधिकाऱ्यांसोबत एसटीने प्रवास करून महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.”