आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि चिंचवड मतदार संघाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) यांचे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात गेली ३५ वर्षे  चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती.

आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. एप्रिल २०२२ पासून त्यांची तब्बेत खालावत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. ३ एप्रिल रोजी पुन्हा ते मायदेशी परतले. दिवाळीच्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक होत झाली. प्रबळ इच्छाशक्ती मुळे अखेरपर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

राजकीय वाटचाल…
पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक दमदार आमदार म्हणून लक्ष्मण जगताप यांच्याकडे पाहिले जायचे. १९८६ मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन २००० मध्ये ते शहराचे महापौर होते. पुढे हवेली विधानसभेसाठी प्रबेळ दावेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते, पण विलास लांडे यांना संधी मिळाली होती. नंतर विधान परिषदेसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकित अपक्ष उमेदवारी करून त्यांनी काँग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला होता. राज्यात ती निवडणूक खूपच गाजली होती.

२००९ मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून शिवसेनेचे आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला आणि विजयश्री खेचून आणली होती. नंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून त्यांनी अत्यंत कडवी झूंज दिली, पण तिथे श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून विजयी झाले.  नंतरच्या काळात बदलती राजकिय समिकरणे लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभेतून आमदारकी केली. २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमदार जगताप यांचे नाव मंत्री पदासाठी आघाडीवर होते. आता त्यांच्या निधनामुळे भाजपा पुढे नेतृत्वाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या निधनावर सर्व राजकिय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.