पुणे पदवीधर निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांचा ‘यॉर्कर’

भाजपा उमेदवारांना तब्बल ५७ संघटनांचा पाठिंबा : आघाडीला तगडे आव्हाना

0

पिंपरी : पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भाजपाविरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना रंगला आहे. अत्यंत चुरशीच्या या लढाईमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘यार्कर’ टाकला आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ५७ संस्था- संघटनांनी भाजपाला लेखी पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघातून जितेंद्र पवार यांना भाजपाने उमेदवारी घोषीत केली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरामध्ये सुमारे २७ हजार मतदारांची विक्रमी नोंदणी केली होती. त्याची प्रदेश पातळीवर दखल घेण्यात आली.

विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांनी महापालिका निवडणुकीप्रमाणे प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले. त्याचबरोबर शहरातील विविध शैक्षणिक संस्थाना भेटी दिल्या आहेत. पदवीधर मतदार संपर्क अभियान राबवून ‘भाजपा टीम पिंपरी-चिंचवड’ तगडी मोर्चेबांधणी केली आहे.

निवडणुकीतील चुरस वाढली असतानाच आमदार लांडगे यांनी आपल्या ‘स्टाईल’ प्रमाणे महा विकास आघाडीला धक्का दिला. कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासह विविध जाती-धर्मांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या विविध ५७ संस्था- संघटनांचा पाठिंबा आणि सक्रिय समर्थन मिळवण्यासाठी लांडगे यांनी यशस्वी शिष्ठाई केली. त्यामुळे या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड भाजपाचे पारडे जड राहील असा विश्वास भाजपा पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
आमदार लांडगे म्हणाले की, शहरात भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केले आहे. निवडणूक प्रमुख आणि संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी निवडणूक प्रचार आणि मतदान कार्यपद्धती याचे प्रभावी नियोजन केले आहे. तसेच, चिंचवड विधानसभा मतदार संघात सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, पिंपरी विधानसभा मतदार संघात सरचिटणीस राजू दुर्गे आणि भोसरी विधानसभा मतदार संघात सरचिटणीस विजय फुगे यांनी सर्व स्तरातील संस्था- संघटनाचे पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवला आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत होणार आहे.

…अशा आहेत प्रमुख संस्था- संघटना!
यशवंतराव चव्हाण स्मारक समिती, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना, मराठवाडा मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड शहर, पिंपरी-चिंचवड मुस्लिम महासंघ, मेडिकल असोसिएशन, श्रीक्षेत्र ओरिसा मित्रमंडळ, राजपूत समाज संघटना, विदर्भ मित्र मंडळ, विश्वभारती बंगाली असोसिएशन, सोसायटी फेडरेशन, कोकण विकास मंच, परशुराम सेवा संघ महाराष्ट्र राज्य,
कपिलवास्तु बुद्ध विहार समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना, शिवगर्जना कामगार संघटना, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, अखिल युवा पत्रकार संघ, मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फॅमिली डॉक्टर असोसिएशनसह एकूण ५७ संस्था- संघटनांनी भाजपाला लेखी समर्थन दिले आहे.

युवा मतदार निर्णायक भूमिका बाजावतील : आमदार निरंजन डावखरे
निवडणूक निरीक्षक आणि आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, पिंपरी- चिंचवडमध्ये अत्यंत उत्कृष्ट काम सुरू आहे. पक्षाच्या दोन्ही आमदारांनी विक्रमी मतदार नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये युवा मतदार सर्वाधिक आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे. युवा मतदार निर्णायक भूमिका बाजावतील. आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुणे जिल्ह्यात आघाडीवर राहू, असा विश्वास आहे. भाजपा उमेदवारांना पाठिंबा दिलेल्या सर्व संस्था- संघटनाचे मी पक्षाच्या वतीने आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार डावखरे यांनी दिली.

मोदी- फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर लोकांचा विश्वास : आमदार लांडगे
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत विविध क्षेत्रातील संस्था- संघटना यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. हे समर्थन निश्चितच अमूल्य आहे. संबंधित संस्था/ संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांसह त्या- त्या विचारधारेतील पदवीधर मतदार भाजपा उमेदवारांना मतदान करतील, असा मला विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.