आमदार माने यांना ‘सेक्स्टॉर्शन’ मध्ये अडकविणाऱ्याला अटक; अनेक अश्लील व्हिडीओ आढळले

0

पुणे : व्हॉट्सअॅपवर कॉल करून सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक।केली आहे. मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना व्हॉट्सअॅप कॉल करून ‘सेक्स्टॉर्शन’च्या जाळ्यात अडकवण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खंडणीखोराला पुणे सायबर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर येथून अटक केली आहे. संबंधित आरोपींनी अशाच पद्धतीने 80 जणांना व्हिडिओ कॉल केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रिजवान अस्लम खान (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील महारायपूर (सिहावली) आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिस मुख्यालय शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, मोहोळचे आमदार यशवंत माने, सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे पाटील, सहायक पोलिस निरीक्षक बलभीम ननवरे आदी उपस्थित होते.

मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने हे पुण्यातील साधू वासवानी चौक परिसरात कुटुंबासह राहत आहेत. 23 जानेवारी रोजी सायबर चोरट्याने त्यांना व्हॉट्सअॅपवरून मेसेज केला. वेळोवेळी अश्लील मेसेज पाठवून व्हिडिओ कॉल करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला.

त्याशिवाय, सायबर चोराने स्क्रीनवर रेकॉर्ड केलेला व्हिडिओ फेसबुकवर माने यांच्या मित्रांना पाठवण्याची धमकी दिली. बदनामी टाळण्यासाठी आरोपींनी एक लाख रुपयांची मागणी केली. आरोपीने फोन करून माने यांना धमकावल्याने त्यांनी पुणे पोलिस आयुक्तालयात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पुणे सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी राजस्थानमधील भरतपूर येथील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे सायबर पोलिसांचे पथक राजस्थानमधील भरतपूर येथे पोहोचले. या पथकाने सात दिवस तपास करून आरोपी रिझवान खानचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली.

तपास पथकात डीसीपी श्रीनिवास घाडगे, एसीपी विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, सहायक निरीक्षक बलभीम ननवरे, उपनिरीक्षक सचिन जाधव आणि राजकुमार जाबा, शिरीष गावडे, श्रीकृष्ण संदीप यादव, प्रवीणसिंग राजपूत आणि पूजा मांडले यांचा समावेश होता.

पुणे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी दिल्यास तत्काळ तक्रार करण्यासाठी नागरिकांनी 7742670358, 8865024862, 8001970178, 9587342828 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ते सायबर पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे देखील भेट देऊ शकतात किंवा 7058719375 आणि 7058719371 वर संपर्क साधू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.