आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा प्रभागनिहाय बैठकांवर जोर
पक्षाची विचारधारा तळागाळात पोचवण्यासाठी मनसैनिकांनी थोपटले दंड
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक विभागाने मतदार याद्या पुनरिक्षण प्रक्रिया हाती घेतलेली आहे. येणा-या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी मनसैनिकांनी कंबर कसली आहे. पक्षबांधणीसाठी प्रभागनिहाय बैठका घेवून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा कार्यक्रम पक्षाच्या शहरातील पदाधिका-यांनी हाती घेतला आहे. मनसेचे शहरातील सर्व विंगचे पदाधिकारी उद्यापासून कामाला लागणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष तथा महापालिकेतील पक्षाचे गटनेते सचिन चिखले यांनी दिली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी वेगवेगळ्या विंगच्या नवीन कार्यकारिणी जाहिर केल्या आहेत. युवा, वाहतूक, विद्यार्थी, महिला आदी संघटनांवर ताकदीचे पदाधिकारी नेमले आहेत. दरम्यानच्या काळात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश करवून घेतला आहे. आता प्रभागस्तरावर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शहाराध्यक्षांकडून पदाधिकाऱ्यांना बळ दिले जात आहे. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात रुजवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागणार आहेत.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या बत्तीस प्रभागांमध्ये प्रभाग निहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. प्रभाग स्तरावर पक्षबांधणीला सुरुवात करण्यात येणार असून प्रभागाची जबाबदारी देण्यासाठी त्या ठिकाणच्या सक्षम मनसैनिकाची निवड केली जाणार आहे. उद्यापासून याला सुरुवात होणार आहे. पक्षाच्या माध्यमातून सत्ताधारी सत्ताधा-यांच्या चुकीच्या कामांना केलेला विरोध आणि त्यामुळे झालेली विकासकामे लोकांपर्यंत पोचविण्यात येणार आहेत. आगामी काळामध्ये विकासकामे करण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून पक्षाला नागरिकांच्या पुढे नेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत मनसेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न पणाला लावण्यात येणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष तथा गटनेते चिखले यांनी दिली.