पिंपरी : शिक्षण संस्थाचालकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागून त्यातील तीस हजार रुपये घेणाऱ्या मनसेचा पुणे जिल्हा संघटकास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. अभय अरुण वाडेकर (रा. चाकण, ता. खेड, जि.पुणे) असे खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी महेंद्र इंद्रनिल सिंग (५१, रा. भोसरी, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. सिंग यांची वाकी खुर्द, चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथे प्रियदर्शिनी इंग्लिश मिडियम स्कूल आहे. गेल्या महिन्याच्या २७ तारखेला वाडेकर हा सिंग यांच्या शाळेत गेला. लॉकडाऊन असतानाही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जास्त फी का आकारली अशी विचारणा केली.
‘आम्ही आंदोलन करून तुमच्या शाळेची बदनामी करू, असे त्याने धमकावले. ते होऊ द्यायचे नसेल, तर एक लाख रुपये द्यावे लागतील,’ असे त्याने सांगितले. आपल्या एका कार्यकर्तीच्या मुलीची फी सुद्धा घेऊ नको, असे सुद्धा बजावले. पाच हजाराचा पहिला हफ्ता पहिल्याच भेटीत त्याने घेतला. नंतर ७ तारखेला चाकणला आंबेठाण चौकात सिंग यांच्याकडून त्याने २५ हजार घेतले. यावेळी यापेक्षा अधिक पैसे देऊ शकणार नाही, असे सिंग म्हणाले.
त्यावर शाळेची बदनामी करण्याची पुन्हा धमकी वाडेकरने दिली. एवढेच नाही, तर उर्वरित पैशासाठी त्याने पुन्हा फोन केला. यानंतर मात्र सिंग यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही तत्परतेने गुन्हा नोंद करत अटक केली आहे. तपास चाकण पोलीस करत आहेत.