मनसेचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; म्हणाले ‘ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी समस्या कायम’

0

ठाणे : शहर आणि परिसरातील रोजच्या वाहतुक कोंडीमुळे ठाण्यातील नागरिक त्रस्त आहेत. आता मनसेने सुद्धा या समस्येवरून नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी येथील समस्या कायम राहतील, असे म्हणत त्यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे की, रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकून पडावे लागत आहे. ही दरवर्षीचीच समस्या आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीच काय, ठाण्याला पंतप्रधानपद जरी दिले तरी येथील समस्या कायम राहतील. सर्वसामान्य नागरिक कर भरतो, त्याचाही विचार केला जात नाही. तेव्हा, मुख्यमंत्रीच काय तर ठाण्याला पंतप्रधानपद दिले तरी ही समस्या तशीच राहणार आहे. ठाणेकरांमध्ये जागरूकता यायला हवी. तरच सुधारणा होतील अन्यथा या समस्या कायम राहतील. यापुढे मतदान करताना विचार करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

  

मुंबई आणि ठाण्यात सतत पडणार्‍या पावसामुळे खड्डे पडल्याने आणि पाणी-चिखल पसरल्याने रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. मुंबई-नाशिक महामार्ग, ठाणे-माजीवडा जंक्शन, घोडबंदर रोड, कल्याण-नाशिक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. 

  

शुक्रवारी या वाहतुक कोंडीत अविनाश जाधव हे अर्धातास अडकले होते.
शुक्रवारी दुपारी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यासाठी ठाणे मनपा मुख्यालयाजवळून वसईकडे जाण्यासाठी निघाले असताना वाटेत व्हिव्हियाना मॉल जवळच अडकून पडले. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व्हिस रोडवर देखील वाहतूक कोंडी होती. वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिका, स्कूल बस यांना बसत आहे. वाहने तासनतास अडकून पडत आहेत. 

  

प्राधिकरणाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले तरी वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसत असल्याने ते त्रस्त आहेत. घोडबंदर परिसरातील नागरिकांना याचा जास्त त्रास होत आहे. 

  

जाधव यांनी प्रशासनावर आरोप करताना म्हटले की, प्रशासन रस्त्यांची डागडुजी करण्यात, वाहतूक कोंडी दूर करण्यात कमी पडत आहे. यंदाही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाचे आगमन यंदा उशिरा होऊनही योग्य नियोजन केले गेले नाही, हे दुर्भाग्य आहे. ठाण्यात कितीतरी आमदार आहेत, त्या आमदारांना मंत्रीपदे दिली तरी सुद्धा समस्या अजून सुटली नाही. 

Leave A Reply

Your email address will not be published.