मनसेच्या रुपाली ठोंबरे-पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मनसेचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बुधवारी (दि. 15) मनसे पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेच आज गुरुवारी (दि. 16) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर घड्याळ बांधले.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची रुपाली पाटील ठोंबरे यांनी गुरूवारी सकाळी अधिकृतपणे जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मनसेचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार, असे सांगितले जात आहे.