घरात घुसत केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकास तीन वर्षे सक्तमजुरी

0
पुणे : अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याच्या फायदा घेत 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला.
संतोष अशोक शिंदे (वय 35) याला शिक्षा सुनावण्यात आली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने सक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
ही घटना 7 नोव्हेंबर 2018 रोजी वाकड परिसरात घडली. पिडीता ही घरी एकटीच असताना घरासमोर राहणारा संतोष हा पिडीतेच्या घरात शिरला. त्यानंतर त्याने पिडीतेचे केस धरून तिला मिठी मारत अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले. या प्रकरणात, महिला पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर व नकुल न्यामाने यांनी तपास करून आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 354, सह लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 7 सह 8 प्रमाणे गुन्हा केल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या प्रकरणात सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले.  आरोपीस निर्दोष सोडल्यास पुन्हा असे कृत्य करण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अ‍ॅड. घोगरे-पाटील यांनी युक्तिवादादरम्यान केली. न्यायालयाने ती मान्य करत आरोपीस शिक्षा सुनावली. याप्रकरणात हिंजवडी पोलिस ठाण्याचे हवालदार दिपक गायकवाड यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहाय्य केले.
यापूर्वीही केले अश्लील प्रकार :
आरोपी याने पिडितेशी यापुर्वीही असेच वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, पिङित मुलीने व तीच्या आईने आरोपीच्या आईस त्याला समजावुन सांगा, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही आरोपीच्या वर्तनात काहीही फरक पडला नव्हता.
Leave A Reply

Your email address will not be published.